नवी दिल्ली – देशातील वीज ग्राहकांना देण्यात येणारी वीज व्यवस्था सक्षम करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत ग्राहकांना चोवीस तास वीजपुरवठा व वेळेवर सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात वीज ग्राहक हक्क व नियम जारी केले गेले आहेत.
३० कोटी जणांना फायदा
वीज दरवाढीची पद्धत अधिक पारदर्शी बनविण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असून २४ तास वीज उपलब्धता वीज ग्राहकांच्या अधिकारांमध्ये समाविष्ट केली गेली आहे. या नियमाचा परिणाम ३० कोटी वीज ग्राहकांना एकूण ११ अधिकारांची हमी मिळणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वीज वितरण कंपन्यांविरूद्ध कारवाई होऊ शकते.
तर कठोर कारवाई
या नियमांविषयी उर्जामंत्री आर.के. सिंह म्हणाले की, देशातील वीज वितरण कंपन्या आता सेवा पुरवठादार म्हणून ओळखल्या जाणार आहेत. त्यामुळे इतर सेवा क्षेत्रांप्रमाणेच वीज ग्राहकांना सर्व अधिकार मिळतील. या नियमांद्वारे सर्वसामान्यांना सक्षम बनवित आहोत. केंद्र सरकारची पुढील पायरी म्हणजे देशभर या नियमांची जाहिरात करणे. जर वीज कंपनीने जाणूनबुजून या नियमांचे उल्लंघन केले तर त्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल.
इतक्या दिवसात जोडणी
वीज मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार वीज ग्राहकांच्या एकूण ११ प्रकारच्या हक्काची हमी दिली गेली आहे. यात मीटर बसवणे, बिले भरणे यापासून नवीन कनेक्शन मिळण्यापासून ते समाविष्ट आहेत. आता सर्व प्रकारच्या वीज जोडण्या घेण्याची ऑनलाईन सुविधा असेल. तसेच नवीन वीज ग्राहकाला योग्य वेळी कनेक्शन द्यावे लागेल. महानगर, तसेच नगरपालिक क्षेत्रात १५ दिवसांत आणि ग्रामीण भागात ग्राहकांना ३० दिवसांच्या आत वीज जोडणी द्यावी लागणार आहे. आपल्या क्षेत्रातील ग्राहकांची मागणी पूर्ण करणे ही डिस्कॉमची जबाबदारी आहे.
तक्रार निवारण
स्मार्ट प्री पेड किंवा प्रीपेड मीटरशिवाय कोणतेही कनेक्शन दिले जाणार नाही. ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्याचा पर्याय देखील द्यावा लागेल. विद्युत नियामक आयोग विशिष्ट परिस्थितीत वीजपुरवठा कालावधी कमी करू शकतो की नाही याची तपासणी करेल. कोणत्या परिस्थितीत वीज कपात होऊ शकते याचा निर्णयही आयोग घेईल. बिले किंवा मीटरसंबंधित तक्रारींच्या निवारणासाठीही कमिशन नियम ठरवेल.