नवी दिल्ली : होळी सणाच्या निमित्ताने देशभरात कोरोना विषाणूची नवीन रुग्ण प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. सक्रिय प्रकरणेही जवळपास ६ लाखांपर्यंत पोहोचली ही चिंतेची बाब आहे. परंतु या सर्वांच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बाब अशी आहे की, देशातील सुमारे ४३० जिल्हे असे आहेत, जिथे कोरोना विषाणूचा एकही नवीन रुग्ण गेल्या २८ दिवसांपासून नोंदवला गेला नाही.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या २८ दिवसांत देशातील ४३० जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे, परंतु की कोरोनाबाबत निष्काळजीपणाने वागू नये. देशातील ८ राज्ये ही कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू असून तेथील स्थिती चिंताजनक आहेत. या राज्यांमध्ये एकूण ८५ टक्के कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना संसर्गाची ५६२११ नवीन प्रकरणे आढळली आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाचा आकडा आता १२,०९५,८५५ वर पोहोचला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्ण संख्या ५ लाख ४० हजार ७२०वर गेली आहे.
सोमवारी, देशभरात सक्रिय प्रकरणांच्या संख्येत १८९१२ ची वाढ झाली आहे. सोमवारी कोरोनामुळे २७१ लोकांचा मृत्यू झाला. यासह, देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढून १६२११४ झाली आहे. मात्र कोरोनावर मात करून आतापर्यंत ११३९३०२१ लोक रुग्णालयातून बाहेर आले आहेत.