नवी दिल्ली – मोदी सरकारमधील पहिला घोटाळा उघड झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतच हा घोटाळा झाला आहे. तब्बल २० लाख ४८ हजार बोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १ हजार ३६४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तशी माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात लेखी दिली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना २०१९ मध्ये सुरु करण्यात आली आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी प्रत्येकी २ हजार रुपयांचे ३ हप्ते देण्यात येतात. या निधीसाठी पारदर्शकता आणावी म्हणून थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. मात्र, कॉमनवेल्थ ह्युमन राईटस इनिशिएटिव्ह या संस्थेचे वेंकटेश नायक यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे या निधीबाबत माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. त्याला मंत्रालयाने उत्तर दिले असून त्यात हा घोटाळा उघड झाला आहे. देशातील २० लाख ४८ हजार बोगस लाभार्थ्यांना एकूण १ हजार ३६४ कोटी रुपये देण्यात आल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेतील तब्बल ४४ टक्के लाभार्थी हे योजनेचे निकष पूर्ण करत नाहीत, असे वेंकटेश यांनी सांगितले आहे. ही बाब लक्षात येताच आता केंद्र सरकारने या निधीची वसुली सुरू केली आहे. आसाम, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये बोगस लाभार्थी सर्वाधिक असल्याचेही वेंकटेश यांनी सांगितले आहे.