पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – मॉर्निंग वॉक करणाऱ्या तीन तरुणांना एसटी बसने उडविल्याची घटना आज सकाळी येथे घडली असून या अपघातात एक तरुण ठार झाला आहे तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील तीन तरुण मित्र नेहमीप्रमाणे सकाळी सर्व्हिस रोडने मॉर्निंग वाक करत होते. त्याचवेळी चांदवडकडून नाशिककडे येणाऱ्या एस.टी बसने रिलायन्स पेट्रोल पंपाच्या जवळ या तिन्ही तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुण जागेवरच ठार झाला. तर अन्य दोन तरुण अपघातातून वाचले असले तरी ते जखमी आहेत. सदर बस चालकाने अपघातानंतर नाशिककडे धूम ठोकली. अपघाताचे वृत्त कळताच प्रकाश पावले यांनी अॅम्ब्युलन्ससह घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव वैभव राजेंद्र दायमा (वय २४) असे आहे. तर, सोमनाथ दिलीप गायकवाड (वय २६) आणि राकेश बाळासाहेब वागले (वय २७) हे दोन तरुण जखमी झाले आहेत. पहाटे साडे सहा वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. याप्रकरणी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तसेच अन्य नोंदी तपासून लवकरच एस टी बस चालकाचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक कवडे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी सोमनाथ गायकवाड या तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.