नवी दिल्ली – केंद्र सरकारने नव्या मेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठी नवे नियम जाहीर केले असून त्याद्वारे २५ एकर जागेची अट रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने याबाबत परिपत्रक जाहीर केले असून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून हे नवे नियम लागू करण्यात येणार आहे.
मेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठी २५ एकर जागेची आवश्यकता असावी हा नियम खूप जुना आहे. परंतु उंचसखल भागात २५ एकर जागा उपलब्ध होत नसल्याने हा नियम रद्द करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. संबंधित नियमामध्ये काही उपनियम असल्याने त्याद्वारे प्रेच वाढत असल्याने अखेरीस आयोगाने हा नियम रद्द केला आहे. मात्र, मेडिकल कॉलेजमध्ये वापरले जाणारे उपकरणे तसेच तत्सम सेवांसाठी पुरेशी जागा असावी असे आयोगाने सूचित केले आहे. शहरी भागात २५ एकर जागा उपलब्ध होत नसल्याने शहरापासून दूर मेडिकल कॉलेज बांधले जाते. मात्र, अंतर लांब असल्याने तेथे रुग्ण जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याच्या चर्चा होत आहेत.
दोन वर्ष जुने रुग्णालय आवश्यक
नवीन नियमांमुळे मेडिकल कॉलेजच्या स्थापनेसाठी दोन वर्षांचे संपूर्णपणे चालणारे रुग्णालय असणे आवश्यक आहे. हे रुग्णालय ३०० खाटांचे असणे आवश्यक आहे. रुग्णालय झाल्यानंतरच मेडिकल कॉलेज उघडण्यासाठी अर्ज करता येतो. सध्या मेडिकल कॉलेजची परवानगी आणि नवीन रुग्णालय स्थापनेची सुविधा एकाचवेळी बनवली जाते. त्यामुळे विद्यार्थी तिसर्या-चौथ्या वर्षात पोहोचल्यावर ३०० खाटांचे रुग्णालय योग्य प्रकारे कार्यरत होत नाही.
हे आहेत नवे निर्देश…
– नवे मेडिकल कॉलेजसाठी अतिदक्षता विभाग आणि जनरल वॉर्डची स्वतंत्र सोय असणे अनिवार्य आहे. तसेच औषध विभाग देखील अद्ययावत असणे आवश्यक आहे.
– ई- लर्निंगच्या दृष्टीने कॉलेजमध्ये सुविधा असावी.
– अद्ययावत प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन सोयीचे होईल याकडे भर देणे.
– पुस्तके तसेच जनरल यांची संख्या कमी करण्यात आली असून त्या ऐवजी ई-लर्निंगवर भर द्यावा.
– अध्ययनासोबतच अनुभवी तज्ज्ञांचे गेस्ट लेक्चर देखील आयोजित केले जावे.