नाशिक – मेट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये ठसा उमटविला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऊर्जेचे पारंपारिक स्त्रोत, अपारंपारिक स्त्रोत, ऑटोमेशन, पावर ट्रांसफार्मर अशा विविध विषयात सात पेटंट प्रकाशित केले असून संशोधन क्षेत्रात नाशिकचे नाव उंचावले आहे.
अपारंपारिक ऊर्जा स्रोत वापरून विजेच्या निर्मितीसाठी व विजेचा दर्जा वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल अशी संकल्पना समोर आणली आहे. पावर ट्रांसफार्मर विषयातील संशोधन करून वीज चोरी व विद्युत परिवहनमध्ये विद्युत गळती थांबविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे उपकरण विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. तसेच ऑटोमेशन क्षेत्रातील संशोधनामुळे वेळेची बचत आणि उत्पादनक्षमतेत वाढ झाल्याने विद्युत उपकरणांची निर्यातीसाठी उपयुक्त ठरणार आहे. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत ‘आत्मनिर्भर भारत’ तयार करण्याकडे वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांन केलेल्या संशोधनाचा स्वयंरोजगार निर्मितीसाठी फायदा होणार असल्याने शहरातील औद्योगिक क्षेत्राला उपयोग होणार आहे. प्राचार्य डॉ. विजय कुमार वाणी, इलेकट्रीकल विभागप्रमुख डॉ. दिपक कदम व संबंधित प्रोजेक्ट गाईड यांचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना मिळाले. मेट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
—
इलेक्ट्रिकल विभागातर्फे करण्यात आलेल्या संशोधनातून तयार करण्यात आलेले प्रकल्प उत्पादनाच्या दृष्टीने सक्षम असून विद्यार्थी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. तयार करण्यात आलेल्या उपकरणांच्या आधारे औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
–डॉ. विजयकुमार वाणी, प्राचार्य, मेट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग