नवी दिल्ली : मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी श्रीधरन पक्षप्रवेश झाल्यास भाजपाला फायदा होऊ शकतो. केरळ भाजपचे प्रमुख सुरेंद्रन यांच्या नेतृत्वात २१ फेब्रुवारीपासून काढण्यात आलेल्या विजययात्रे दरम्यान श्रीधरन अधिकृतपणे पक्षात सहभागी होतील.
यासंदर्भात श्रीधरन म्हणाले की, मी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला असून या पक्षामध्ये सामील होण्याचे मुख्य कारण म्हणजे मला केरळसाठी काहीतरी करायचे आहे. त्यासाठी मी निवडणुक लढण्यास तयार आहे. या संदर्भात भाजपाचे सुरेंद्रन म्हणाले की, श्रीधरन यांनी भाजपबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेव्हा विजय यात्रा मलप्पुरमला पोहोचेल, तेव्हाच ते पक्षात सामील होतील. मलप्पुरम हा श्रीधरनचा मूळ जिल्हा आहे. एप्रिल-मेमध्ये केरळ विधानसभा निवडणुका होत असून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी ही आमची इच्छा आहे.
श्रीधरन यांचे वय ८८ वर्षांचे असून भारताचे प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर आहेत. १९९५ ते २०१२ या काळात ते दिल्ली मेट्रोचे संचालक होते. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले. देशातील सार्वजनिक वाहतुकीचे स्वरूप बदलण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. श्रीधरन हे पंतप्रधान मोदींचे समर्थक मानले जातात. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन वेळा त्यांनी नरेंद्र मोदींना एक चांगला नेता म्हणून संबोधले होते.