बीड – १९९३ साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपात मृत्यूने थैमान घातलेले असताना त्या मृत्यूला देखील जगण्याची उमेद दिलेला, माणसातला देव मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या रूपाने पाहिला, असे भावनिक उद्गार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहेत. खा. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते.
ना. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेल्या ‘महाशरद’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ‘ई-बार्टी’ या मोबाईल अँपचे खा. शरद पवार यांच्या हस्ते व्हर्च्युअली अनावरण करत लोकार्पण करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सभापती रामराजे निंबाळकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खा. सुप्रिया सुळे, खा. सुनील तटकरे , खा.फौजिया खान , रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री महोदय, खासदार, आमदार, यांसह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी राज्यभरातून व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते.
ना. मुंडे यांनी यावेळी ‘महाशरद’ या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींना सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करण्यासाठी आवश्यक विविध सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देणे व त्यासाठी विविध दानशूर व्यक्ती/संस्था आदींची सांगड या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून घालून देणे, ही प्रक्रिया या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कशी साधली जाईल याबद्दल माहिती देताना या माध्यमातून आपले 29 लाख दिव्यांगापर्यंत मदत पोहचवण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ना. मुंडेंनी नमूद केले. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ‘ई-बार्टी’ या मोबाईल अँप बद्दलही ना. मुंडे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून, राज्यभरात विविध ठिकाणी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे बीड येथील व्हर्च्युअल रॅलीत सहभागी झाले होते, यावेळी खा. पवार यांच्या बद्दल बोलताना दिलेल्या 7 मिनिटांच्या वेळेत पवार साहेबांचे कर्तृत्व मांडणे ही अशक्य बाब असून, साहेबांचे नेतृत्व हिमालयाईतके उंच, अढळ असून साहेबांचे विचार हे एक चालते बोलते विद्यापीठ आहेत, तसेच माझ्यासाठी ते एक शक्तीपीठ आहेत असे भावोद्गार यावेळी ना. मुंडेंनी व्यक्त केले.
यावेळी बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आ. सय्यद सलीम, सुनील धांडे, उषा दराडे, ज्येष्ठ नेते डी. बी.बागल, ऍड.सुभाष राऊत, सतीश शिंदे, कल्याण आखाडे, सौ. रेखा फड यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.