नवी दिल्ली – मृत्यूपूर्वी देण्यात आलेली जबानी स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी कुठलेही कठोर मापदंड नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. हे जबान एखाद्या आरोपीला दोषी ठरविण्यासाठी पुरेसे आहे, मात्र ते स्वेच्छेने दिलेले असावे आणि त्याची विश्वासार्हता तपासली जावी. कारण कुठलीही या जबानीबाबत कुठलीही शंका निर्माण झाली तर त्याचा फायदा आरोपीलाच होईल, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.
न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदविले दिल्ली उच्च न्यायालयाच्या ऑगस्ट २०११ च्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने एका महिलेचा खून करणाऱ्या दोन आरोपींना निर्दोष ठरविण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. न्यायालय म्हणाले, मृत्यूपूर्वी देण्यात आलेले बयाण एक अत्यंत महत्त्वाची साक्ष मानली जाते. एखाद्या दोषी ठरविण्यासाठी हे बयाण पुरेसे आहे. मात्र बयाणाची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात अडकण्यासारखा एखादा विरोधाभास आढळून आला तर त्याचा फायदा आरोपीलाच होतो.
संबंधित प्रकरणाबाबत न्यायालय म्हणाले की, ज्या महिलेचा खून झाला ती बयाण देण्याच्या परिस्थितीत होती अशी खात्री पटवून देणारा पुरावा कुणाकडेच नाही. त्यामुळे ज्या महिलेचा मृत्यू झाला तिचे बयाण शंका उपस्थित करणारे आहे. या प्रकरणात डॉक्टरांच्या उपस्थितीसह कुठलाच पुरावा नाही, ज्यामुळे महिला मृत्यूपूर्वी बयाण देण्याच्या परिस्थितीत होती यावर विश्वास बसावा. अश्यात महिलेने आत्महत्या केल्याचा दावा फेटाळून लावणे सुरक्षित नाही, असा निर्वाळा देत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
असे होते प्रकरण
एका व्यक्तीने 1991 च्या एका प्रकरणात मृत बहिणीचा नवरा आणि नणंद यांची निर्दोष सुटका झाल्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. 17 डिसेंबर 1991 ला महिला आपल्या सासरी 95 टक्के जळालेल्या अवस्थेत होती आणि दुसऱ्या दिवशी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचा दावा आरोपींनी केला होता. तो सिद्ध झाल्यामुळे आरोपींचा सुटका झाली होती.