नोएडा – पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या घरी चोरी झाली आहे. २६ लाख रुपये रोख आणि लाखोंचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वीच एका एजन्सीच्या माध्यमातून कामावर रुजू झालेला ओदिशा इथला नोकर मदन मोहन दास याच्यावर पोलिसांचा संशय असून, पोलिसांनी सेक्टर-२० पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
राम सुतार हे मुलगा अनिल सुतार, सून, नातवंडांसोबत सेक्टर -१९ मध्ये राहतात. सेक्टर-१९ मधील त्यांचं घर पोलिस चौकीला लागूनच आहे. राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतारसुद्धा मूर्तिकार आहेत. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आराखडा तयार केला आहे.
मंगळवारी सेक्टर-१९ स्थित घरी राम सुतार, त्यांची नात आणि दोन नोकर होते. त्या दिवशी सायंकाळी मदन मोहन त्यांच्या खोलीत घुसला आणि त्यानं कपाटाचं कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेले २६ लाख रुपये आणि लाखोंचे दागिने घेऊन पळाला. त्यानंतर घरच्यांना याबाबत कळालं. पोलिसांना माहिती देऊन पाचारण करण्यात आलं.
अनिल सुतार यांनी चार दिवसांपूर्वीच दिल्ली इथल्या मेरी नीड्स एजन्सीकडून एका नोकराची कामावर नियुक्ती केली होती. त्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली नव्हती. प्लेसमेंट एजन्सीमध्ये जमा केलेल्या कागदपत्रांवरून त्याचं नाव मदन मोहन दास (२४) असं असून, तो ओदिशा इथला रहिवासी आहे, असं नोएडाचे अपर पोलिस उपायुक्त रणविजय सिंह यांनी सांगितलं.
अनिल सुतार होते मुंबईत
मूर्तिकार अनिल सुतार मंगळवारी पत्नीसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला मुंबईला गेले होते. त्या दिवशी राम सुतार आणि त्यांची नात घरात होती. घटनेच्या वेळी नातू मार्केटमध्ये गेला होता. तो घरी परतल्यावर चोरी झाल्याचा खुलासा झाला. पोलिस सीसीटीव्हीच्या फुटेजवरून तपास करत आहेत. तसंच प्लेसमेंट एजन्सीच्या संचालकांचीही चौकशी करत आहेत.