पाटील म्हणाले, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव ६ हजार, मूग हमी भाव ७ हजार १९६ असा जाहीर केला आहे. चालू हंगामात मूग, उडिदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे.
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद, मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा. केंद्र शासनाकडे हमीभावाने मूग, उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव ३१ ऑगस्ट ला पाठविण्यात आला आहे. लवकरच मान्यता अपेक्षित आहे, असेही श्पटील यांनी यावेळी सांगितले.