मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात लवकरच बैठक – छगन भुजबळ
नाशिक – मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची विविध मागण्यांसंदर्भात नाशिक कार्यालयात भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजीज पठाण, पदाधिकारी मुशताक शेख, इब्राहीम अत्तार, जाकीर शेख, मुख्तार शेख, कय्युम शेख, मुख्तार शेख, इम्तियाज पिजार्स आदी उपस्थित होते.
मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये मा. उच्च न्यायालयाने मान्य केलेले मुस्लिमांचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण कायम करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुस्लीम विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावे, सारथी संस्थेच्या आधारावर मुस्लीम समाजासाठी संस्था स्थापन करण्यात यावी त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, मुस्लीम युवकांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच मुस्लीम समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी अॅट्रोसिटीच्या आधारावर कायदा तयार करण्यात यावा अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी या सर्व मागण्यांबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन याबाबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.