सटाणा – तालुक्यातील मुल्हेर येथे नातेवाईकांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एकाची हत्या करण्यात आली आहे. १० जण जखमी झाले असून चार जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी मुल्हेरमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुलत भावाच्या लग्नास नातेवाईक उपस्थित न राहिल्याचे कुरापत काढून नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात केदारनाथ भिका पवार (वय ५०) यांची निघृण हत्या करण्यात आली. पवार यांचे चिरंजीवाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (४ सप्टेंबर) रात्री आपल्या घरासमोर आरोपी जानकाबाई सुपडू पडाळकर, सोनी हिरामण पडाळकर, हिरामण सुपडू पडाळकर, चिंतामण सुपडू पडाळकर, राणी चिंतामण पडाळकर, (सर्व रा. मुल्हेर) महादु सदा पडाळकर, भावडू सदा पडाळकर, सोमनाथ पडाळकर, राकेश पडाळर, छोटी पडाळकर (रा. जोरण) व उद्धव पडाळकर (रा. डांगसौदाणे) यांनी हातात लाकडी लांडके, लोखंडी रॉड, काठ्या व सुरा, चाकू घेऊन आले. अचानक घराबाहेर त्यांनी शिवीगाळ केली. तसेच, नातेवाईक असतांनाही आमच्याकडे लग्नास का आले नाहीत असा जाब विचारत मारहाण सुरूू केली. यावेळी चुलत बंधू केदारनाथ भिका पवार (वय ५०) हे जमावात घुसले. एकमेकांची समजूत काढू लागले. त्याचवेळी हिरामण पडाळकर यांनी लोखंडी रॉड पवार यांच्या पाठीवर मारला. तर चिंतामण पडाळकर यानी चाकूने केदारनाथ यांच्या पोटावर व छातीवर जोरदार वार केले. त्यात केदारनाथ हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी, पोलिस हवालदार जे.बी.सोनवणे, आर.डी.भोये, डी.एल.भोये, सुनिल पाटील, राजू गायकवाड, पकंज खैरनार यांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित ४ जण ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत.