चाळीसगाव – मुलीच्या लग्नाच्या दिवशीच आईचे निधन झाल्याची दुर्देवी घटना येथे घडली आहे. त्यामुळे केवळ लग्न मंडपातच नाही तर संपूर्ण शहरातच हळहळ व्यक्त केली जात आहे.
तरवाडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका संगीता राजेंद्र भोकरे (वय ५०) आणि भडगाव तालुक्यातील उमरखेड येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र भोकरे यांची कन्या मयुरी हिचा विवाह मंगळवारी (८ डिसेंबर) येथील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात होता. मात्र, लग्नाच्याच दिवशी संगीता यांचा दुर्देवी मृत्यू झाला. काही महिन्यांपासून स्वादूपिंडाच्या आजाराने त्या त्रस्त होत्या. मुलीच्या लग्नाच्या दिवशीच काळाने त्यांना गाठले. मंगळवारी सकाळीच संगीता यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांचे दुपारच्या सुमारास निधन झाले. ही वार्ता लग्नमंडपात येऊन धडकली आणि सर्वत्र शोककळा पसरली. मात्र, कुटुंबियांनी धीराने लग्नसोहळा पार पाडला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास संगीता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीता यांच्या पश्चात सासू, पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.
अतिशय मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून संगीता यांचा नावलौकिक होता. मुलीच्याच लग्न दिवशी आईचे निधन झाल्याने संपूर्ण चाळीसगाव परिसरात अतिशय हळहळ व्यक्त केली जात आहे.