नाशिक – मुलीची छेड काढल्याने संतप्त झालेल्या पित्याने २१ वर्षीय गुराख्याची निघृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांनी फिरस्ता असलेल्या संशयितास हुडकून काढल्याने या खुनास वाचा फुटली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने दिलेल्या माहितीनुसार, पिनेश उर्फ पिन्या रमेश खरे (रा.सामोडे, जि. धुळे. हल्ली फिरस्ता) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. हिरालाल प्रजापती (२१, रा. मडसांगवी, मुळ रा. नेपाळ) नामक गुराख्याचा गेल्या सोमवारी (दि.२८) रात्री सरस्वती लेन मधील प्रकाश सुपारी दुकानासमोर निघृण खून झाला होता. दुचाकीवर आलेल्या दोघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रकाली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रजापती यांस तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे कारण स्पष्ट न झाल्याने पोलीस यंत्रणा पुरती कामाला लागली होती.
भद्रकाली आणि युनिट १ चे पथक समांतर शोध घेत असतांना युनिट १ च्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली. संशयीत फिरस्ता असल्याने पोलीसांनी गेली चार दिवस जुने नाशिक व गंगाघाट पिंजून काढला. अखेर संशयीत दुतोंड्या मारूती परिसरात मिळून आला. त्याने गुह्याची कबुलीही दिली आहे. गुराखी असलेल्या प्रजापतीने आपल्या मुलीची छेड काढल्याने त्याचा काटा काढल्याचे त्याने कबूल केले आहे. संशयीतास भद्रकाली पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त दीपक पाण्डेय,उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील,सहाय्यक आयुक्त समिर शेख यांच्या मार्गदर्श नाखाली वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ,अजय शिंदे,सहाय्यक निरीक्षक सचिन खैरणार,महेश कुलकर्णी,रघुनाथ शेगर,दिनेश खैरणार,उपनिरीक्षक बलराम पालकर,जमादार पोपट कारवाळ,विजय गवांदे,हवालदार वसंत पांडव,अनिल दिघोळे, रविंद्र बागुल,यवाजी महाले,पोलीस नाईक शरद सोनवणे,मनोज डोंगरे,मोहन देशमुख,संतोष कोरडे,आसीफ तांबोळी,दिलीप मोंढे,शांताराम महाले,फय्याज सय्यद,विशाल काठे,शिपाई निलेश बोईर,राहूल पालखेडे,विशाल देवरे,प्रविण चव्हाण,गणेश वडजे,गौरव खांडरे,मुक्तार शेख,राम बर्डे,प्रतिभा पोखरकर,समाधान पवार आदींच्या पथकाने केली.