नवी दिल्ली – मुलींच्या विवाह योग्य किमान वयाचे मूल्यांकन करण्यासाठी गठित समितीने आपला शिफारस अहवाल पंतप्रधान कार्यालय आणि महिला व बाल विकास मंत्रालयाला सूपूर्द केला आहे. या समितीने मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याची जोरदार शिफारस केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला व बाल विकास मंत्रालय आता समितीच्या शिफारशींवर विचार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतांना सांगितले होते की, महिलांच्या विवाहासाठी किमान वय किती असावे यावर सरकार विचार करीत आहे. तसेच आम्ही आमच्या मुलींच्या लग्नासाठी किमान वयाचा फेरविचार करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. जेव्हा समिती अहवाल सादर करेल, तेव्हा आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. सध्या मुलींचे लग्न करण्याचे किमान वय १८ वर्षे आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली गेली होती. त्यांनी नुकतीच यासंदर्भातील शिफारशी सादर केल्या आहेत.