जयपूर (राजस्थान) – सिकर जिल्ह्यातील उद्योग नगरात मुलाच्या मृत्यूनंतर धक्का बसलेल्या एकाच कुटुंबातील चार लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने केवळ परिसरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पाच महिन्यांपूर्वी या कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाला होता. रविवारी मुलाचे वडील, आई आणि दोन बहिणींनी गळफास घेतला. संपूर्ण कुटुंब मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करू शकले नाही. त्यांच्या वागण्याबोलण्यात कमालीचे नैराश्य आले होते, असे परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले.
या घरातून एक सुसाईड नोट मिळाले आहे. त्यात लिहीले आहे की, ‘मुलाच्या मृत्यूनंतरच आमची जगण्याची इच्छा मेलेली होती. आम्हाला कुणालाच जगायचे नव्हते, कारण आमचे सगळे काही तोच होता.’ चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी या कुटुंबातील तरुण मुलाचा ह्रदयविकाराचा धक्का बसल्याने मृत्यू झाला होता. तेव्हापासून घरातील वातावरण नैराश्याचे झाले होते.