नाशिक – विवाह समारंभ हा अनेकांच्या साक्षीने संपन्न होतो. कोरोनामुळे अनेक निर्बंध आल्याने आता मोजक्यांच्या उपस्थितीतच तो उरकतो. पण, सध्या चर्चा आहे ती एका अनोख्या विवाह सोहळ्याची. मुलगी बघायला गेले अन थेट लग्नच करुन आले, असा हा अनोखा विवाह समारंभ संपन्न झाला आहे.
नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद हरीभाऊ पिंगळे यांचे चिरंजीव सीअर्स डाय अँड माेल्ड प्रा. लि. कंपनीत इंजिनिअर असलेले धीरज पिंगळे आणि सटाणा येथील सामाजिक कार्यकर्ते कै. अशाेक लक्ष्मण येवला यांची नात आणि दीपक व वैशाली येवला यांची कन्या चंचल यांचा विवाह सोहळा सध्या विशेष चर्चेत आहे. काेणताही गाजावाजा न करता छाेटेखानी समारंभात धीरज आणि चंचल यांनी आपल्या सहजीवनाला सुरूवात केली आहे. परिणामी त्यांनी समाजासमाेर एक आदर्शही निर्माण केला आहे.
या लग्न साेहळ्यावेळी दोन्ही बाजूकडील प्रत्येकी २५ म्हणजे एकूण ५० जणच उपस्थित होते. याच समारंभात कोरोनाच्या विविध नियमांबाबत प्रबोधन करण्यात आले. पिंगळे व येवला कुटुंबांनी या अनाेख्या लग्न समारंभात मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. याेग्य ते सामाजिक अंतर ठेवून उपस्थितांच्या बसण्याची व्यवस्था केली.
असे जुळले तार
सटाणा येथील दीपक व वैशाली येवला यांची कन्या चंचल हिला पाहण्यासाठी पिंगळे परिवाराला आमंत्रण देण्यात आले. सायंकाळी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. वधू-वरांची पसंती झाली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी साखरपुडा करण्याचे निश्चित करण्यात आले.
साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असतानाच ज्येष्ठ सामािजक कार्यकर्ते रमाकांत अलई, काशिनाथ अलई, सदाशिव अलई, यांनी वधू-वर पित्यांना बाेलावून सध्याच्या काेराेना काळात माेठ्या प्रमाणात लग्न साेहळा करणे याेग्य नसल्याचे सुचविले. याला पिंगळे आणि येवला परिवारानेही संमत दर्शविली. त्यामुळेच साखरपुड्याच्याच दिवशी सायंकाळी लग्न साेहळा करण्याचे ठरले. अवघ्या चार तासांत लग्नाची तयारी पूर्ण झाली आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा लग्न साेहळा संपन्न झाला.