नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी सोनं तारण ठेवून कर्ज देणारी कंपनी मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचं शुक्रवारी (५ फेब्रुवारी) सायंकाळी निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. मुथूट ग्रुपमधील मुथूट फायनान्स ही देशातील सर्वात मोठी नॉन बँकिंग गोल्ड लोन कंपनी आहे.
१९३९ मध्ये केरळमध्ये मुथूट कंपनीची स्थापन झाली. एमजी जॉर्ज मुथूट यांनी १९७९ मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी मुथूच कंपनीचं व्यवस्थापकीय संचालकपद स्वीकारलं. १९९३ मध्ये मुथूट समुहाचं अध्यक्षपद स्वीकारलं. एमजी जॉर्ज हे मुथूट समुहाचे अध्यक्षपद भूषवणारे कुटुंबातील तिसर्या पिढीचे सदस्य होते.
एमजी जॉर्ज मुथूट हे केरळमधील ऑर्थोडॉक्स चर्चचे विश्वस्त होते. याशिवाय ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. ते केरळ राज्य परिषदेचे अध्यक्षही होते.
फोर्ब्ज मासिकातही दखल
गेल्या वर्षी फोर्ब्ज मासिकात सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत मुथूट यांना स्थान मिळाले होते. या यादीत समावेश असलेल्या सहा मल्याळी व्यक्तिंपैकी जॉर्ज मुथूट एक होते. एमजी जॉर्ज मुथूट यांच्या नेतृत्वात मुथूट ग्रुपनं जगात ५००० हून अधिक शाखा आणि २० पेक्षा अधिक व्यवसायांमध्ये विस्तार केला आहे.
भारतातील सर्वात मोठी सुवर्णकर्ज कंपनी
एमजी जॉर्ज यांच्या नेतृत्वात समुहाची मुथूट फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी सुवर्णकर्ज कंपनी झाली. कंपनीचे बाजार भांडवल ५१ हजार कोटींहून अधिक असून, एकूण उत्पन्न ८ हजार ७२२ कोटी रुपये आहे.