पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, मी यापुढे मुख्यमंत्रीपदी राहणार नाही. आता एनडीएशी युती करण्यात आल्याने भाजपाचे कोणीही मुख्यमंत्री झाले, तरी मला यात काही हरकत वाटत नाही. कारण मला पदाची इच्छा नाही. मात्र नितीशकुमार यांच्या या विधानाने बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार प्रथमच बैठकीला संबोधित करत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, मला आता या पदाची लालसा नाही आणि पदावर रहाण्याची इच्छा नाही. वास्तविक निवडणुकीच्या निकाल आल्यानंतर मी युतीला माझी इच्छा सांगितली. पण दबाव इतका होता की, मला पुन्हा काम हाती घ्यावे लागले. आम्ही स्वार्थासाठी काम करत नाही. आजपर्यंत आम्ही कधीही कोणताही करार केलेला नाही.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशात जेडीयूच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या घटनेचा संदर्भ देताना ते म्हणाले, अरुणाचलमध्ये जे घडले त्याचे दुःख वाटते, सहा लोकांनी पक्ष सोडल्यानंतरही जेडीयूचा एक आमदार तिथेच राहिला. पक्षाची ताकद समजून घ्या. आपल्याला केवळ तत्त्वांच्या आधारेच लोकांमध्ये जावे लागेल. मात्र द्वेषाचे वातावरण तयार होते. आम्ही तिरस्काराच्या विरोधात आहोत. प्रत्येक काम लोकांच्या हितासाठी केले गेले. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दिशाभूल केली जात आहे. त्याला चांगल्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या पाहिजेत. समाजात मतभेद असू नये.
इतकेच नव्हे तर आपल्या भाषणाच्या वेळी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दूर होण्याविषयीही भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही पक्षासाठी रात्रंदिवस कामात व्यस्त असतो. मात्र गोंधळामुळे पक्षाध्यक्षांचे हे काम व्यवस्थित दिसू शकले नाही. पक्षाच्या संघटनेचा विस्तार व्हावा, अशी माझी इच्छा आहे.