नाशिक – राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची शुक्रवारी दूरचित्रवाणी द्वारे बैठक घेतली. यामध्ये सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांचे जिल्ह्यामधिल कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.सर्व जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याबद्दल मुख्य सचिव यांनी यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याबद्दल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
नाशिक जिल्ह्यामध्ये केलेल्या विविध उपायोजना उदाहरणार्थ गर्दीवर घातलेले निर्बंध, टेस्टिंग बाबत सुरू असलेली कार्यवाही, मागील वर्षी या अनुभवातून निदर्शनास आलेल्या विविध बाबी याबाबत मुख्य सचिव यांना अवगत करण्यात आले. वाढती रुग्ण संख्या ही बव्हंशी नाशिक शहरामध्ये केंद्रित झालेली असल्याने नाशिक शहरातील एकंदरीत कामकाजाकडे अधिक लक्ष देण्याबाबत मुख्य सचिव यांनी सूचना दिल्या.
महापालिकेच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे, कंटेनमेंट झोन मधील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे तसेच महापालिकेची लॅब लवकरात लवकर सुरू करणे, पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगीकरणाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत आहेत किंवा कसे यावर निगराणी ठेवावी अशा सूचना महापालिका आयुक्त नाशिक मालेगाव यांना दिल्या.
त्याचप्रमाणे पोलिस विभागाने रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोरपणे कारवाई करावी, त्याचप्रमाणे मास्क सामाजिक आंतर व अन्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बिनचूकपणे होत आहे किंवा कसे तसेच अधिसूचनेद्वारे घातलेल्या निर्बंधांचे पालन होत आहे किंवा कसे याबाबत अत्यंत सतर्कतेने व प्रभावीपणे कारवाई करावी अशा सूचना मुख्य सचिव यांनी पोलीस आयुक्त नाशिक शहर व पोलीस अधीक्षक यांना दिल्या.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त नागरिकांना लवकरात लवकर लक्ष देण्यात यावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आल्या.
या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.