नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी (दि. ११) सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत. यावेळी ते कोरोनास्थिती आणि लसीकरणाबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतरच मोदी देशव्यापी लसीकरणाची घोषणा करणार आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोग्य मंत्रालयामार्फत सिरम संस्था आणि भारत बायोटेक यांच्याबरोबर लस खरेदी करारास अंतिम रूप देण्यात येत आहे. तथापि, लसीची किंमत आणि पुरवठा हमी यावर अद्याप बोलणी झालेली नाही. देशात गरजू लोकांपर्यंत योग्य प्रकारे लस पोचविणे आवश्यक आहे. त्याकरिता पंतप्रधान मोदी सोमवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील आणि लसी वितरण प्रक्रिया योग्यप्रकारे होण्यासाठी राज्याचा सक्रीय सहभागाबाबत मार्गदर्शन करतील.
महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळातील लॉकडाऊन व अनलॉक प्रक्रियेदरम्यान पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत आभासी बैठक घेत आहेत. देशातील सर्व जिल्ह्यांत लसीकरणाची दुसरी रंगीत तालीम यशस्वी होऊन सर्व अंतीम तयारी पूर्ण झाली आहे. पुढील आठवड्यातील लसीकरण सुरू केले जाऊ शकते. सीरम संस्था सुमारे दोनशे रूपये दराने एक लस डोस देण्यास तयार असून भारत बायोटेक देखील सिरम संस्थेच्या लसीपेक्षा कमी दराने लस पुरवण्याचे आश्वासन देत आहे. दराच्या मुद्द्यांवरील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत आणि लवकरच करारावर स्वाक्षरी होऊ शकते.