नागपूर – राज्याच्या उपराजधानीत साजरा झालेला देशाचा प्रजासत्ताक दिन एक अनोखा ऋणानुबंध दृढ करणारा होता. त्यासाठी निमित्त ठरले ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नागपूर भेटीचे. मुख्यमंत्र्यांचा गेल्या काही दिवसातला हा विदर्भातील चौथा दौरा. या चारही दौऱ्यांमागचा उद्देश वेगवेगळा असला तरीही त्यामागचे भावनिक सूत्र एकच होते, ते म्हणजे विदर्भाशी विविध पातळ्यांवर जोडली गेलेली एक परिपूर्ण बांधिलकी अधिक दृढ करण्याचे!
कोरोनाचे सावट ओसरु लागत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध आघाड्यांवरील कामांना गती दिली आहे. या साथीमुळे राज्याच्या विकासाला कोणतीही खीळ बसू नये, यासाठी त्यांची सातत्याने धडपड राहिली आहे. राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचा त्यांचा निर्धार कृतीच्या पातळीवर उतरत आहे. यासोबतच विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या राज्यातील भागांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विदर्भाने गेल्या काही दिवसांत त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेतली आहे.
या विकासकामांच्या आढाव्याचा प्रारंभ त्यांनी गेल्याच महिन्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामास प्रत्यक्ष भेट देऊन केला. त्यासाठी त्यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा केला होता. अत्यंत काटेकोरपणे त्यांनी महामार्गाशी संबंधित सर्व कामांची पाहणी करुन येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत शिर्डीपर्यंतचा टप्पा कार्यान्वित करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि त्यानुषंगाने संबंधित यंत्रणेला गतीने कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र विधिमंडळाच्या कायमस्वरुपी कक्षाचे ऑनलाईन उद्घाटन करताना विदर्भ आपल्या हृदयात असून, या माध्यमातून हा अनुबंध अधिक घट्ट करण्याचे वचन दिले होते. हे वचन अवघ्या महिन्याभरात कृतीत आणताना त्यांनी त्यानंतर तीन दौरे केलेत. विदर्भ विकासाचे खऱ्या अर्थाने सिंचन करु शकणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पास त्यांनी भेट दिली. हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प सर्व घटकांच्या सहकार्याने येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच ते पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. या दौऱ्यात त्यांनी गोसेखुर्द जलाशयात येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांची अतिशय आस्थेने माहिती घेतली. त्यांची ही कृती पर्यावरणाप्रती संवेदनशीलता दाखविणारी ठरली. विकासासोबतच पर्यावरणविषयक घटकांचेही संवर्धन करण्याची भूमिकाच जणू त्यांनी त्यातून दाखवून दिली.
विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात केली असतानाच भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेमुळे व्यथित झालेले मुख्यमंत्री त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तातडीने भंडारा येथे दाखल झाले. भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही शोकाकूल मातांची भेट घेतली. त्यांची वेदना ऐकून ते काही क्षण निःशब्द झाले. त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. या दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही, याची मला जाणीव आहे. स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे, अशा शब्दात सहवेदना व्यक्त करतानाच यापुढे अशी घटना घडणार नाही असे वचनच जणू मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मातांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली ही विनम्र सह्रदयता पाहून दोघींचे कुटुंबीय सद्गदित झाले.
राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतांनाच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केली होती.
मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विदर्भाशी आपले रक्ताचे नाते असल्याची भावनिक ग्वाही दिली. विकासाचा निर्धार, पर्यावरणाचे संवर्धन, भावनिक एकरुपता आणि सर्वसामान्यांप्रती संवेदनशीलता अशा विविध स्वरुपाच्या आशयातून साकारलेले मुख्यमंत्र्यांचे हे चारही दौरे विदर्भासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. यातून विदर्भाशी असलेल्या अतूट बांधिलकीच्या सूत्राला मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा आवर्जून उजाळा दिला.