हैद्राबाद – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस. शर्मिला यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. आपल्या वडिलांच्या जुन्या सहकार्यांशी त्यांनी चर्चा केली असून लवकरच तेलंगणात त्या नवीन पक्ष स्थापन करतील असे एकंदरीत राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे.
या संदर्भात, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, जगन मोहन आणि शर्मिला यांच्यात कोणताही वैयक्तिक वाद नाही, फक्त तेलंगणाच्या राजकारणात भावा-बहिणींमध्ये ‘मतभेद’ आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे की, शर्मिलाला आपला भाऊ जगन मोहन रेड्डी यांच्या हस्तक्षेपाशिवाय शेजारील तेलंगणामध्ये स्वत: चा पक्ष स्थापन करायचा आहे.
शर्मिलाचे वडील स्व. वाय.एस. राजशेखर रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे २००४ ते २००९ पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यानंतर रेड्डी यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. आता शर्मिला या वडिलांच्या जवळच्या काही मोठ्या नेत्यांशी संपर्कात आहेत. परंतु त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही, मात्र त्या म्हणाल्या की, जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेशमध्ये आपले काम करत आहेत आणि मी आता तेलंगणात माझे काम करीन.
दरम्यान, वायएसआर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार सजल रामकृष्ण रेड्डी म्हणाले की,शर्मिला ही राजशेखर रेड्डी यांची मुलगी असल्याने तिच्यात नेतृत्वगुण आहेत. तर वायएसआर कॉंग्रेसचे तेलंगणा राज्यातील ज्येष्ठ नेते कोंडा राघव रेड्डी यांनी सांगितले की, शर्मिला एक राजकीय पक्ष स्थापन करतील आणि आपली विचारसरणी लोकांपर्यंत नेतील. त्यांच्या मते तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेला येथे जाहीर सभेत येत्या काही दिवसांत नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जाईल. तसेच एका बैठकीदरम्यान त्यांच्या निवासस्थानावरील बॅनरवर शर्मिला आणि तिचे वडील राजशेखर रेड्डी यांची छायाचित्रे होती. मात्र, जगन मोहन रेड्डी यांचे छायाचित्र कोठेही दिसत नव्हते.