मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात करण्यात आली. मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये याचा शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोविड योध्यांना मानाचा मुजरा केला. सध्या आपल्या हाती लस आली असली तरी ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस आणि महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी संकट अजूनही टळले नाही असे सांगत सावधगिरीचा इशाराही दिला.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.