मुंबई – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील.
मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम :
सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण, स.१०.१५ वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. स. १०.१५ वा. काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. स. ११.१५ वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. स. ११.३५ वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १२.२० वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी राखीव. दु. १ ते १.४५ वाजेपर्यंत राखीव.दुपारी १. ४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व ३.३० वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सोलापूर- आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सोमवारी धीर दिला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने २२ आणि २३ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.