नाशिक – मराठीतील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार तद्वतच पहिले कीर्तनकार म्हणून नावलौकिक मिळवलेले व भागवत धर्माची पताका थेट पंजाब प्रांतापर्यंत येणारे संत नामदेव महाराज यांचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अध्यासन केंद्र उभारावे, असे मत संत साहित्याच्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे अर्धशतक संत नामदेव यांनी भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला. संत ज्ञानेश्वरांना भागवत धर्माचा पाया रचणारे तर संत तुकाराम महाराजांना भागवत धर्माचा कळस उभारणारे म्हटले जाते. त्याचप्रमाणे धर्माचे देवालय उभारण्याचे श्रेय संत नामदेवांना व त्यांचे सहकारी संत प्रभावळींना दिले जाते, यावरून त्यांच्या कार्याची प्रचिती येते, असे सांगून संत वाङमयाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी स्पष्ट केले की, संत नामदेवांनी सुमारे २५०० अभंगांची रचना केली आहे. त्यांचे अभंग रचण्याची नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून सावित्रीबाई पुणे विद्यापीठांत देखील संत नामदेव अध्यासन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे .
पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव पदवी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. नरसी नामदेव (जिल्हा हिंगोली ) येथे संत नामदेव जन्मगावी एक स्मारक आहे . याशिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील त्यांच्या नावाची मंदिरे व समाज मंदिरे आहेत.
दरम्यान , भागवत धर्माची पताका देशभर देणारे संत नामदेव यांचे नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे भव्य स्मारक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, तसेच मुक्त विद्यापीठात संत नामदेव अध्यासन नावे यासाठी अनेक वेळा चर्चा करण्यात आली असून त्यासाठी बैठका देखील झाल्या असून हा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न तत्काळ मार्गी लागावा समस्त शिंपी समाज संघटनेचे पदाधिकारी अरुण नेवासकर यांनी केली आहे.