नाशिक – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे राबवल्या जाणाऱ्या ११९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २१ जुलै पासून प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्यातील २ हजार हुन अधिक केंद्रांवर शिक्षणक्रम राबवले जातात. या प्रवाशांसाठी आता चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून ३० सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावयाचे आहेत.
विद्यापीठामार्फत २१ जुलैला प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली होती. यासाठी पहिल्यांदा ३० ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर अनुक्रमाने १५ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याअंर्तगत ३ लाख ९४ हजार ३६३ अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी प्रवेश प्रक्रियेत एकूण ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. परंतु, अद्याप काही विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छूक असल्याने प्रवेशासाठी मुदत वाढवून देत असल्याचे मुक्त विद्यापीठाने सांगितले आहे. मुक्त विद्यापीठामार्फत एमबीए, ऍग्रीकल्चर तसेच बीएड अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहेत. येत्या महिनाभरात ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ऑफलाईन पद्धतीने संबंधित अभ्यासक्रम सुरु होणार असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत चौथ्या मुदतवाढी पर्यंत प्राप्त झालेले प्रवेश अर्ज कमी असल्याने निदर्शनास आले आहे.