हर्षल भट, नाशिक
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे सध्या ऑनलाईन परीक्षांचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठतर्फे यंदा ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून त्यासंबंधी विविध एजन्सीतर्फे निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासंबंधित अधिकृत माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
पुणे विद्यापाठोपाठ आता मुक्त विद्यापीठाने देखील ऑनलाईन परिक्षेचा निर्णय घेतला आहे. नोकरी संभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी मुक्त विद्यापीठात असल्याने त्याच्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. मुक्त विद्यापीठात विविध अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत असतात. नोकरी सांभाळून शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी विद्यापीठ कार्यरत असते. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठाच्या ठराविक केंद्रांवर परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निविदा पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत याआधी पीएचडीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या आता पदवीच्या परीक्षा देखील ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या परीक्षा कधी होतील याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. पण, लवकरच वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.