नाशिक – येत्या काळात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विस्तार ग्रामीण भागासह गोवा आणि देशातील इतर राज्यात होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मुक्त विद्यापीठाचे कामकाज, विस्तार याचा आढाव्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज बैठक झाली. त्यास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर आदी उपस्थित होते. यावेळी सामंत म्हणाले की, मुक्त विद्यापीठाचा विस्तार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये करून गोवा या राज्यात विद्यापीठाचा विस्तार करण्यात येणार आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांसोबत चर्चा झाली असल्याचे देखील यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
सीमावर्ती भागात केंद्र
गोव्यामध्ये या अध्यासानाला यश मिळाल्यास विद्यापीठ अनुदान आयोगासोबत चर्चा करून देशातील मोठ्या राज्यांमध्ये हे या विद्यापीठाचे केंद्र उभारण्यात येतील. सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना मुक्त विद्यापीठाचा फायदा व्हावा यासाठी कोल्हापूर आणि बेळगाव या जिल्ह्यातील चंदगड, उमडी आणि म्हैसाळा या गावांमध्ये छोटेखानी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तसेच राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा यांचे मिळून एक, रायगड आणि ठाणे यांचे मिळून एक तर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशीम येथे उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत कौशल्याधारित अभ्यासक्रमावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे. पुणे या ठिकाणी १० कोटी रुपये खर्चून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्राचे काम होणार आहे, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
देवळालीत पायलट प्रोजेक्ट
मुक्त विद्यापीठाचा ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील देवळाली येथे ग्रामपंचायत स्तरावर मुक्त विद्यापीठाचे केंद्र पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात यावे; तसेच ग्रामीण भागात सुरू करण्यात येणाऱ्या केंद्रावर तेथील स्थानिक लोकांचा व्यवसाय लक्षात घेवून त्याअनुषंगाने अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करावेत, ज्यामुळे तेथील लोकांना नोकरी व व्यवसाय करण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होईल. फक्त महिलांसाठी देखील अल्प मुदतीचे अभ्यासक्रम असावेत यासाठी समिती तयार करण्यात यावी, अशा सुचनाही मंत्री श्री. सामंत यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.