घोटी (ता. इगतपुरी) – तालुक्यातील मुकणे धरणात तीन युवक बुडाले असून त्यातील एकाचा वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे युवक धरणावर आंघोळीसाठी आले असून तिघेही परप्रांतीय युवक आहेत.
जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत काम करत असलेले काही परप्रांतीय युवक होळी सण साजरा करत असतांना दुपारी मुकणे धरणावर आंघोळीसाठी आले. आंघोळ करीत असतांना त्यातील तीन तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. त्याचवेळी बाकीच्या तरुणांनी आरडा-ओरड केली. त्यामुळे स्थानिक नागरिक मदतीला धावले. तसेच काही नागरिकांनी वाडीव-हे पोलिसांना फोनवरुन माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांच्या मदतीने रविन्द्र भरत सिंग या तरुणाला वाचविण्यात यश आले आहे. तर मनोज कुमार मोहनचंद्र जोशी (वय ५१, रा.गौजिली, उत्तराखंड) आणि कामलसिंग खरकसिंग बिष्ट (रा. नैनीताल, उत्तराखंड) हे दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. बचावलेल्या तरुणाला जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी जिल्हा रुग्णालयात हलविले. धुलिवंदन दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने जिंदाल कंपनी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास वाडीव-हेचे पोलिस निरिक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिंदे, पोऊनि पाटील, हवालदार देवीदास फड हे करीत आहेत.