नवी दिल्ली – मुंबई-नाशिक-नागपूर हाय स्पीड रेल कॉरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेनसाठी हवाई सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे महामंडळातर्फे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोमवारी विमानाद्वारे नाशिक ते अकोलादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. काल अकोला ते नागपूर दरम्यानचं सर्वेक्षण पार पडलं. आजही हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे.
लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे लिडार असं या सर्वेक्षणाचं नाव आहे. या सर्वेक्षणामध्ये एकाच विमानात लीडार आणि फोटो किंवा व्हिडिओ घेणारे सेंसर लावलेले असतात. हे विमान हवेतून प्रस्तावित मार्गाचा सर्वे पूर्ण करतं. नेहमीच्या पद्धतीने हा सर्वे केल्यास त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो मात्र लीडार सर्वेक्षणामुळे हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होणार आहे.