नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहेत. मुंबई आणि नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच असेल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितले. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. या दोन्ही ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना आहे. सर्वांचा सन्मान राखून निवडणूका लढवल्या जातील असेही त्यांनी सांगितले. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढल्याचा फायदा झाल्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
नाशिक दौ-यावर संजय राऊत आले असता त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी ईडी व सीबीआय बोलतांना सांगितले की, ईडी, सीबीआय यांनी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागू नये. केंद्राला हवे तसे या संस्था काम करतात. त्यामुळे ईडी, सीबीआयची प्रतिमा मालिन झाली आहे.
शरद पवारांबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, शरद पवारांना पंतप्रधानापर्यंत पोहचू न देण्याचा काँग्रेसचा मोठा हातभार आहे. हे मी पूर्वीपासून सांगत आलो आहे. त्यांना पंतप्रधानांची संधी आधीच मिळायला हवी होती. शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती, त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. देशाचे नेतृत्व करण्यासाठी सगळ्यात जास्त क्षमता असलेला नेता म्हणून त्यांचा उल्लेख करायला हवा असेही ते म्हणाले. यूपीएच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, यूपीएचं नेतृत्व कुणी करावं, यावर नेहमी चर्चा होत असते. मात्र निर्णय नाही. महाराष्ट्रातला नेता यूपीएचा अध्यक्ष झाला, तर आनंदच असेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत ते म्हणाले की, शेतकरी आंदोलन कुणीही हायजॅक केलेलं नाही, ते शेतकऱ्यांचंच आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने एक पाऊल मागे घेतल्यास सरकारने शरणागती पत्करली असे होत नाही.
शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात असेल तर देशाचे संरक्षण मंत्री का गप्प बसलेत असा सवालही त्यांनी केला. यावेळी राज्यपालांवर बोलतांना ते म्हणाले की, आमचा विश्वास घटनेवर आहे. राज्यपालांचा सरकारमध्ये हस्तक्षेप नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाचाही घटनाबाह्य हस्तक्षेप सहन करत नाही