नाशिक – सेवानिवृत्तीचे अनेक सोहळे होतात. पण, साधारण कर्मचाऱ्याला त्याची स्वप्नपूर्ती करता आली तर? असाच प्रकार मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये घडला आहे. त्यामुळेच या सेवानिवृत्ती सोहळ्याची सध्या पोलिस दलात मोठी चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास वरिष्ठांनी थेट आपल्या खुर्चीवर विराजमान करीत दहा मिनिटांसाठी पोलीस निरीक्षक (पीआय) बनविले. एवढेच नव्हे तर निवृत्त कर्मचाऱ्यास वरिष्ठांच्या वाहनातूनच आपल्या घरी सोडण्यात आले. त्यामुळे हा निरोप समारंभ पोलिस दलात विशेष चर्चेचा ठरला.
मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश पगार हे दोन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले. पोलिस दलातील ३२ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शहर पोलिस दलातील विविध पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली. शिस्तप्रिय असल्याने त्यांचा मोठा दबदबा होता. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना निरोप देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना निरोप दिला.
दहा मिनीटांसाठी पोलिस निरीक्षक पदाच्या खुर्चीचा पदभार देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पगार यांना गहिवरून आले होते. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांमुळे प्रदीर्घ सेवा दिल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्यानंतर पगार दाम्पत्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या वाहनातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे त्याची वार्ता सध्या सगळीकडे पसरली आहे.