नवी दिल्ली – मुंबईमधील सोमवारी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर केंद्रीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नेतृत्वात केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या आपत्तींचे कारण शोधून काढून त्यावर शक्य असलेल्या सर्व उपायांबाबत हे पथक राज्य सरकारला मार्गदर्शन करले असेही ते म्हणाले.
मुंबईमधील सोमवारी खंडित झालेला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे, २००० मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी सुमारे १९०० मेगावॉटचा पुरवठा आता सुरु झाला आहे, उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल अशी माहिती आर.के.सिंग यांनी सोमवारी दुपारी दिली. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता असे त्यांनी सांगितले.