मनाली देवरे, नाशिक
….
ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराह यांच्या तिखट मा-या समोर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना मुंबई इंडियन्सचे २०८ धावांचे आव्हान पेलता आले नाही. अखेरीस मुंबई इंडियन्सने हा सामना ३४ धावांनी जिंकून दोन रग्गड गुणांची कमाई आपल्या खात्यात केली. मुंबई इंडियन्स साठी सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे त्यांचा नेट रनरेट या विजयनंतर आणखी सुधारला असून तो +१.२१४ इतका मजबूत झाला आहे
रविवारी दुपारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. शारजातल्या छोट्या मैदानावर सनरायझर्स हैद्राबादचे फलंदाज ही धावसंख्या पार करतील असे वाटत होते. खास करून डेव्हिड वाॕर्नर, जॉन बेरस्टो आणि मनीष पांडे यांनी सुरुवात चांगली करून दिल्यानंतर मात्र मधल्या फळीत फॉर्मात असलेला प्रियम गर्ग, केन विल्यमसन अभिषेक शर्मा यांच्याकडून सनरायझर्सला असलेल्या अपेक्षा एका पाठोपाठ एक फोल ठरत गेल्या आणि जिंकणार, जिंकणार असे म्हणणा-या सनरायझर्स हैद्राबादचा पराभव झाला. २० षटकांत ७ बाद १७४ धावा करणारा सनरायझर्स हैदराबाद संघ अखेरीस या लढतीत ३४ धावांनी पिछाडीवर पडला.