मनाली देवरे, नाशिक
……
आयपीएल २०२० च्या अगदीच एकतर्फी झालेल्या क्वालिफायर–१ सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपीटल्सचा ५७ धावांनी जबरदस्त पराभव केला. या विजयानंतर मुंबई इंडीयन्स आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहाचले असून दिल्ली कॅपीटल्सला तिथे पोहोचण्यासाठी माञ, आता क्वालिफायर–२ या सामन्यात स्वतःला सिध्द करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
“लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम….” हे मुंबई इंडीयन्सच्या थिम सॉंग मधले शब्द न शब्द खरे करून दाखवित या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपीटल्सवर विजय मिळवला. त्यांच्या या कामगिरीने दिल्ली पुरती हादरली आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा–या मुंबईच्या संघाने भारताची राजधानी असलेल्या दिल्ली संघावर विजय मिळवला.
दिल्लीचा एकतर्फी पराभव
२०० ही मोठी धावसंख्या पार करण्याचे काम दिल्ली कॅपिटल्स साठी क्षमतेपलिकडचे ठरले. या धावसंख्येचा पाठलाग करतांना पहिल्या २ षटकातच ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान मा–यापुढे पृथ्वी शॅा, शिखर धवन आणि अंजिक्य रहाणे हे तीन मुख्य फलंदाज भोपळा न फोडताही बाद झाल्यामुळे अगदी सुरूवातीलाच बसलेल्या या झटक्यातून दिल्ली कॅपीटल्स शेवटपर्यन्त सावरलाच नाही. अष्टपैलू मार्कस स्टॉयनीस (६५) आणि गोलंदाज अशीच मुख्य ओळख असलेल्या अक्षर पटेलच्या नाबाद ४२ धावा यामुळे दिल्लीला २० षटकात फक्त ८ बाद १४३ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. मुंबई इंडीयन्सचे या सामन्यावर शेवटपर्यन्त इतके वर्चस्व होते की दिल्लीला क्षणभरही डोके वर काढण्याची संधी मिळाली नाही. जसप्रीत बुमराने या सिझनमध्ये सर्वाधिक बळी घेणा–या दिल्ली कॅपीटल्सच्या कागिसो रबाडाला देखील मागे टाकले ही मुंबईसाठी आणखी एक जमेची बाजु ठरली. बुमराचे आता २७ बळी झाले असून रबाडा २५ आणि ट्रेन्ट बोल्ट २२ बळी, हे तीन गोलंदाज पर्पल कॅपच्या शर्यतीत दिसून येतील.
मुंबईची दमदार फलंदाजी
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी घेवून धावांचा विस्फोट घडवून आणला. रोहीत शर्मा आणि कायरन पोलार्ड हे संघातले दोन मुख्य फलंदाज, त्यापैकी एक कप्तान तर दुसरा उपकप्तान. परंतु, हे दोघेही शुन्यावर बाद झाल्यानंतर देखील मुंबईच्या फलंदाजीला काहीच फरक पडला नाही. मुंबईची हीच ताकद या संघाला पहिल्या क्रमांकावर ठेवण्यास उपयुक्त ठरली होती. क्विंटन डीकॉकने रोहीत शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर स्वतःला सावरलं. मोजके आणि जास्त धोकादायक फटके निवडले नाहीत. त्याने १ षटकार खेचला आणि ५ चौकार लगावले. २५ चेंडूत त्याच्या ४० धावा झाल्या परंतु, रोहीत बाद झाल्यानंतर संघाला दबावातून बाहेर काढण्यास त्या उपयुक्त ठरल्या. सुर्यकुमार यादवला या आयपीएलने एक वेगळे बळ मिळवून दिले आहे. भारतीय निवड समिती त्याच्या पाठीशी नसली तरी मुंबई इंडीयन्स माञ त्याच्या पाठीशी पुर्णपणे उभी आहे हे त्याला माहित झाल्यानंतर त्याची खेळी आणखी बहरली आहे. या महत्वाच्या सामन्यात त्याचे अर्धशतक म्हणजे मुंबई इंडीयन्ससाठी मौलीक बाब ठरली. फलंदाजीचा शेवट गोड केला तो ईशान किशन आणि त्याच्या पेक्षाही जास्त हार्दीक पांडयाच्या कामगिरीने. हार्दीकच्या ३७ पैकी ३० धावा या षटकार खेचून आल्या आणि त्यामुळे त्याचा संघ १७०–१८० च्या आसपास मजल मारेल अशी अपेक्षा असतांना देखील संघाच्या तब्बल २०० धावा फलकावर लागल्या. ईशान किशन हा मुंबईचा “छोटा पॅकेट बडा धमाका” असा खेळाडू आहे. त्याची नाबाद ५५ धावांची खेळी म्हणजे मुंबई संघाच्या डावाचा कणा ठरली. पहिला पॉवरप्ले सुर्यकुमार आणि डीकॉक यांनी योग्य पध्दतीने हाताळला होता, शेवटच्या पॉवरप्ले मध्ये ईशान आणि हार्दीकने दिल्लीच्या गोलंदाजाची सपशेल धुलाई केली. कागिसो रबाडा हा पर्पल कॅप बाळगणारा गोलंदाज या वादळाच्या तडाख्यातून सुटला नाही आणि डॅनिएल सॅम आणि अॅनरीच नॉर्टजे यांना प्रति ओव्हर ११–१२ धावांचा मार पडला. ज्या रविचंद्रन अश्विनची फिरकी साखळीत फारशी चाललीच नाही त्या अश्वीनला या महत्वाच्या सामन्यात ३ बळी मिळाले हे विशेष.
शुक्रवारची लढत
आता ६ नोव्हेंबरला म्हणजे, शुक्रवारी “विराट कोहलीची टीम” अशी भली मोठी ओळख असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा मुकाबला, धक्के खात खात प्लेऑफ मध्ये पोहोचलेल्या परंतु, प्रतिस्पर्ध्याला पराभवाचा धक्का केव्हाही देण्याची ताकद असलेल्या सनरायझर्स हेद्राबाद या संघाशी होईल. हा एलीमिनेटर स्वरूपाचा सामना असेल, म्हणजे जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल आणि जो संघ जिंकेल त्याला फायनलमध्ये पोहोचण्यापुर्वी दिल्ली कॅपीटल्स विरूध्द लढावे लागेल.