नवी दिल्ली – मुंबईतील जुहू चौपाटी वरुन थेट शिर्डी, शेगाव, लोणावळा, गणपतीपुळे अशा विविध शहरांसाठी सी प्लेन विमानाने जाता येईल. जमीन आणि पाण्यावर उतरु शकणाऱ्या (सीप्लेन) या सेवेसाठी केंद्र सरकारने २१ जानेवारीपर्यंत इच्छूक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत.
बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय संभाव्य विमान कंपन्यांमार्फत स्पेशल पर्पज व्हेइकल अंतर्गत निवडक मार्गांवर सीप्लेन सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेची सुरूवात करीत आहे. सी प्लेन वाहतुकीसाठी कित्येक ठिकाणे दृष्टीपथात ठेवण्यात आली आहेत. हब आणि स्पोक मॉडेल अंतर्गत प्रस्तावित मूळ-ठिकाणांच्या जोड्यांमध्ये अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप या विविध बेटांचा, आसाम मधील गुवाहाटी रिव्हरफ्रंट आणि उमरांसो जलाशय, यमुना रिवरफ्रंट/दिल्ली (हब म्हणून) ते अयोध्या, टिहरी, श्रीनगर (उत्तराखंड), चंदीगड आणि पंजाबची अनेक पर्यटन स्थळे आणि हिमाचल प्रदेश; मुंबई (हब म्हणून) ते शिर्डी, लोणावळा, गणपतीपुळे; सुरत (हब म्हणून) ते द्वारका, मांडवी आणि कांडला; खिंडसी धरण, नागपूर व ईरई धरण, चंद्रपूर (महाराष्ट्रात) आणि कंपन्यांनी सुचविलेले इतर कोणतेही हब आणि स्पोक यांचा समावेश असेल.
अशीच एक सी प्लेन सेवा आधीपासूनच अहमदाबादमधील केवडिया आणि साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान सुरू आहे. किनारपट्टी भागात किंवा जलसंचयांच्या सान्निध्यात अशा प्रकारच्या अधिक सेवा चालविण्यासाठी इच्छुक नियोजित/ अनियोजित विमान कंपन्यांबरोबर एसडीसीएल उत्सुक आहे.
सी प्लेन जवळच्या पाणवठ्यांचा वापर टेक ऑफ आणि लँडिंगसाठी करेल आणि अशा प्रकारे या ठिकाणांना जास्त किफायतशीरपणे जोडेल कारण पारंपरिक विमानतळ पायाभूत सुविधा जसे कि धावपट्टी व टर्मिनल इमारती सी प्लेनच्या कार्यासाठी आवश्यक नाहीत.
देशभरात जलद आणि आरामदायक वाहतुकीचे पूरक साधन उपलब्ध करून देणारी सी प्लेन सेवा ही ऐतिहासिक असेल. ती प्रवासाचा वेळ वाचवेल आणि विशेषत: डोंगराळ प्रदेशात किंवा नद्या/तलाव इत्यादी प्रवासातील स्थानिक अंतर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देईल. पर्यटन आणि व्यवसाय उपक्रमांना याद्वारे मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.