रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा
मुंबई – मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, बहृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महापालिकांचे आयुक्त, कोकण विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी
या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
दरडग्रस्त भागातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे
दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशा सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे.
अनपेक्षिरित्या घडणाऱ्या गोष्टी गृहित धरुन तयारी करा
अतिवृष्टीच्या काळात काही नैसर्गिक गोष्टी घडणे अपेक्षित असते तर काही गोष्टी या अनपेक्षितपणे घडतात. आपण अपेक्षित गोष्टी गृहित धरून तयारी करतो परंतू ज्या अनपेक्षित गोष्टी घडू शकतात त्या गृहित धरून प्रशासनाने त्याचीही तयारी करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या काळात मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.
रुग्णसेवेत अडथळा नको
अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजन चा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष नको
कोविड काळात कोविड आणि पावसाळी आजार एकत्र आले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते याकडे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले तसेच पावसाळी आजार उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीवर विशेषत: मलेरियावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
पाणी साचणारी ठिकाणे लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणाऱ्या स्थळांचा शोध घ्यावा, पंपींग स्टेशन्स आणि झडपा यांची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी, यातील अडथळे दूर करावेत, लो लाईन एरियात विशेष काळजी घ्यावी, गरज पडल्यास या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात, धोकादायक इमारतींमधील नागरिकांना धोक्याची कल्पना देऊन संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरीत होण्यास सांगावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
बृहन्मुंबई महापालिकेची तयारी ; बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त
इक्बालसिंह चहल यांनी लहान आणि मोठ्या नाल्यांची केलेली स्वच्छतेची कामे, मोठ्या नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण याची माहिती दिली ते म्हणाले की यावर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले असून याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचऱ्याचे काम करतील असेही ते म्हणाले. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले. त्यांनी पालिका क्षेत्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनला निधी देऊन स्कॉड तयार केल्याची माहिती दिली. हे स्कॉड त्या वॉर्डमध्ये झाडे पडल्यास,हायटाईडमुळे अडचणी निर्माण झाल्यास त्याच्या निवारणाचे काम करतील, झाडं पडल्यास ते तत्काळ तिथून हटवून रस्ते वाहतूकीसाठी मोकळे राहतील याची काळजी घेण्यात आल्याचे सांगतांना त्यांनी प्रत्येक वार्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरीत केले जाईल असे सांगितले. एनजीओच्या मदतीने स्थलांतरीत लोकांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती ही त्यांनी दिली.
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. लसीचे साठे ज्या शीतगृहात आहेत तिथे पॉवर बॅकअप दिल्याचेही ते म्हणाले. मुंबई महानगर पालिका रुग्णालये, शासकीय रुग्णालये, क्षेत्रातील कोविड सेंटर्सवर तसेच खासगी रुग्णालयांकडे ऑक्सीजनचा साठा पुरेसा असल्याबाबत, पॉवर बॅकअपच्या सुविधांकडे लक्ष देण्यास कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यांनी जनरेटर्सची उपलब्धता, अतिरिक्त लागणारे जनरेटर्स, डिझेलचा साठा याची ही माहिती दिली.
सर्व जिल्हे आणि महापालिकाही सज्ज
याच बैठकीत विभागातील इतर महानगरपालिका आयुक्त, जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीच्या काळात केलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. सर्व यंत्रणा सज्ज आणि सतर्क केल्याचे सांगतांना त्यांनी धोकादायक इमारती, लो लाईन एरिया, दरडग्रस्त भाग आणि किनारपट्टीच्या ज्या भागात लोकांना स्थलांतरीत करण्याची गरज लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजना, कोविड रुग्णालयांची काळजी, ऑक्सीजन, डिझेलचा साठा, जनरेटर्सची व्यवस्था, दरडग्रस्त भागातील, धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आदी कामांची माहिती ही दिली.