नवी दिल्ली – कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली रात्रीची संचारबंदी (कर्फ्यू) आता राजधानी दिल्ली आणि चंदीगड या दोन शहरांमध्येही लागू करण्यात आली आहे. दररोज रुग्णांची वाढणारी आकडेवारी गतवर्षीप्रमाणे लॉकडाउन परिस्थितीला पुन्हा आणत आहे. दिल्लीत आणि चंदीगडमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा दोन्ही राज्य सरकारांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कोरोनाच्या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच कोरोना विषाणूची एक नवीन लाट जनतेची भीती वाढवू लागली आहे. देशात कोरोनाची रोजची प्रकरणे येथे लाखोंच्यावर पोहोचली आहेत. दिल्ली सरकार आणि चंदीगड प्रशासनाने नाईट कर्फ्यूबाबत सोमवारी घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाची सर्वाधिक नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कॅबिनेट सचिवांच्या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसमवेत झालेल्या बैठकीत सादर केलेल्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, पाच राज्ये आणि 1केंद्रशासित प्रदेशामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त प्रमाणात रुग्ण प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये महाराष्ट्र , पंजाब, दिल्ली, चंडीगड, छत्तीसगड आणि गुजरातचा समावेश आहे.