मुंबई – अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत असतांना दिवाळी नंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. मात्र, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यात इतरत्र नववी ते बारावीचे वर्ग सुरु होत असल्या तरी मुंबई मधील शाळा बंदच राहणार आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळा आता नव्या वर्षातच सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई महापालिकेतर्फे विशेष अधिकाराअंतर्गत ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईमधील बहुतांश शाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहे. त्यामुळे तेथे सॅनिटायझेशन करण्यासाठी वेळ हवा असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दिवाळी नंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवल्या जाणार असल्या तरी नियमित ऑनलाईन वर्ग होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
—