नाशिक – कमी व्याजदरात कर्ज देण्याचे अमिष दाखवून एकाने एका मध्यस्थासह १० जणांना पावणेतीन लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बजिराणी (रा. अंधेरी, मुंबई) असे गंडा घालणार्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रानू सुनील पाटील (रा. डीजीपी नगर, सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित बजिराणी याने पाटील यांना त्याच्या ग्लोबल ट्रस्ट सर्व्हिसेस या फायनान्स कंपनीत नोकरी दिल्याचे भासवले. तसेच त्यांना कमी व्याजदारात कर्ज वितरण करणार असल्याचे सांगून गरजू कर्जदार जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पाटील यांनी अनेक कर्ज घेण्यास तयार असणारांशी बजिराणी याची भेट घालून दिली. संशयिताने सर्वांकडून कर्ज प्रकरण प्रोसेसिंग फी तसेच इतर कारणे देत ८ हजार ते ७० हजारापर्यंतच्या रकमा घेतल्या. अशा एकूण १० जणांकडून २ लाख ८३ हजार ७५० रूपयांची रक्कम गोळा केली. परंतु कोणालाही कर्ज दिले नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील व इतर गुंतवणुकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक पी. बी. बाकले करत आहेत.