मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. तूर्तास मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. तसेच, या सर्व प्रकरणाची चौकशी एसपी (पोलिस अधिक्षक) दर्जाच्या महिला अधिका-याने करावी अशी, मागणी राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आरोप करणा-या व्यक्तीविषयी इतर गोष्टीही पुढे आल्या आहेत. इतर लोकही पुढे आले आहेत. त्यामुळे संपूर्ण चौकशी नंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे पवार यांनी सांगितले आहे.
मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत एका महिलेने थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सुरू झालेला वाद लक्षात घेता मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीली. त्यात त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केला. त्यानंतर भाजपने मुंडे यांना खिंडीत गाठण्यासाठी आक्रमक धोरण स्विकारले. या प्रकरणी भाजपने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर गुरुवारी आरोप करणा-या महिलेविरुध्द भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष धुरी, जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरैशी यांनी सुध्दा वक्तव्य केले आहे. हनी ट्रॅपमध्ये अोढण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून पुढे आले आहे.