मी वारली चित्रशैली बोलतेय…
ए होय, मीच बोलते आहे… वारली चित्रशैली ! मला तुमच्याशी खूप दिवसांपासून बोलायचं होतं. तशी तर मी रसिकांशी चित्रांमधून नेहमीच मूकपणे संवाद साधते. पण आज मन मोकळं करणार आहे ते माझ्या एका सुपुत्राच्या ८६ व्या जयंतीनिमित्ताने. जिव्या सोमा मशे या सुपुत्राच्या भरीव योगदानामुळे मला एक पारंपरिक लोककला म्हणून प्रतिष्ठा मिळाली. झोपडीच्या चार भिंतींतून मुक्त होऊन मी थेट जागतिक कॅनव्हासवर विराजमान झाले. वारली चित्रशैली या नावाने सुपरिचित होऊन माझी सर्वत्र ओळख झाली. आजचा क्षण कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. म्हणूनच हा थेट सुसंवाद !
माझं वय काही थोडथोडकं नाही. मी तब्बल ११०० वर्षांची आहे. माझा जन्म दहाव्या शतकात ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी वारली पाड्यावर झाला. पण आपली भेट, ओळख होण्यासाठी मात्र खूप काळ जावा लागला ! लवकरच त्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होतील. मराठी मातीत मुळं रुजलेल्या माझ्या चित्रवृक्षाच्या शाखा आता जगभरात सर्वत्र विस्तारल्या आहेत. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला मुंबईतील ‘ वीव्हर्स सेंटर ‘ च्या तत्कालीन अधिकारी पुपुल जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भास्कर कुलकर्णी या कलाकार अवलियाने माझा शोध घेतला. डहाणू तालुक्यातील दुर्गम पाड्यावर आमची भेट झाली. तो माझ्यासाठी सुवर्णक्षण होता.
कुलकर्णी यांना पाड्यावरच्या काही महिला त्यांच्या झोपड्यांच्या भिंतीवर चित्रे काढतांना आढळल्या. त्यांच्याबरोबर जिव्या मशे हा देखील तांदळाच्या पिठाने चित्रे रंगवत होता. हे बघून प्रभावित झालेल्या भास्कर कुलकर्णींंनी त्या सर्वांकडून ती चित्रे कागदांंवर काढून घेतली. नंतर ४ महिला व मशे यांच्यासह हे रेखावैभव ते थेट दिल्लीला घेऊन गेले. अशाप्रकारे मी देशाच्या राजधानीत पोहोचले. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी माझे कौतुक केले. मला राजाश्रय मिळाला. मशेच्या आग्रहामुळे अधिकृत नाव मिळून ‘वारली चित्रकला’ या नावाने मला सगळेजण ओळखायला लागले. लवकरच मी महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र रेषांच्या माध्यमातून जणु सीमोल्लंघन केले. मग अल्पावधीतच लोकाश्रयही मिळाला. नंतर जिव्याने त्याच्यासोबत मला अनेक देशात नेले. मला जागतिक ओळख मिळाली. प्रारंभापासून माणूस हाच माझा केंद्रबिंदू ठरला. त्याच्या जोडीला निसर्ग, पर्यावरण, पशुपक्षी, जंगल, शेती, तेथील माणसांचे दैनंदिन जीवन, त्यांची संस्कृती, नृत्यप्रकार या साऱ्यांना मी रेखांकित केले.
माझ्या माध्यमातून रेखाटन करतांना वारली चित्रकार स्वच्छ, सुस्पष्ट भाष्य करतात. चित्रात संदिग्धता रहात नाही. त्यातून त्यांची प्रगल्भता, विचारांची दिशा, तळमळ दिसून येते. ११०० वर्षे माझे अस्तित्व अबाधित ठेवण्यात वारली जमातीतील सुवासिनी, भगत, धवलेरी ( स्त्री पुरोहिता ) यांचे मोठे योगदान आहे. वर्षानुवर्षांच्या वाटचालीत मी नित्यनूतन, प्रवाही राहिले त्याचे श्रेय असंख्य अनामिक वारली कलाकारांना जाते. त्यांच्या प्रत्येक कृतीत सभोवतालाविषयी कृतज्ञता, निसर्गाबद्दल प्रेम,पर्यावरणाचे भान, परिसराचे संतुलन आढळते. त्या साऱ्याला व दैनंदिन जगण्याला ते सुंदर चित्ररुप देतात. आनंद, समाधानातून माझी निर्मिती होत असली तरी वारल्यांच्या मनाच्या तळाशी व्यक्त होण्याची तळमळ असते; प्रसंगी अस्वस्थताही माझ्या जन्मवेणांची साक्षी होत असते; त्यातूनच माझे रसरशीत रूप प्रकट होते. माझे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आकारांचे सुलभीकरण ! माझे प्रकटणे अगदी प्रासादिक आहे. त्यात व्यामिश्रता नाही. साध्यासोप्या त्रिकोण, वर्तुळ, चौरस या भौमितिक मूलाकारांमधून व काही रेषा, बिंदू यांच्या सोबतीने मी आकाराला येते, कशासाठीही अडून राहात नाही. झोपडीच्या भिंतीवर मी तांदळाच्या पिठातून आकार घेते. वरकरणी अशिक्षित असणारी माझी लेकरं अंतर्यामी निरागस, संवेदनशील आहेत. सभोवताली घडणाऱ्या बारीकसारीक घटनांची, प्रसंगांची नोंद ते चित्रांतून घेतात. त्यामुळे तसेच चैतन्यशील रुप मला मिळते. माणसांंच्या जगण्याशी निगडित समकालीन विषय चित्रित होतात. भवताल कवेत घेण्याचे सामर्थ्य मला प्राप्त होते. समोरून तसंच वरुन दिसणाऱ्या दृश्याचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण केले जाते. चित्रातील आकृत्यांना कोणतेही तपशील नसतात. केवळ एक वर्तुळ, दोन उलटसुलट त्रिकोण, काही रेषा व ठिपके यातून मनुष्याकृती तयार होते. तसेच प्राणी, पक्षी रेखाटले जातात; तरीही रसिकांना साधेपणातून एक परिपूर्ण अशी चित्र-मिती अनुभवास येते.
माझा लाडका सुपुत्र जिव्या याचा जन्म २५ डिसेंबर १९३४ रोजी धामणगाव येथे झाला. बालवयातच मातापित्यांचे छत्र हरपले. त्या धक्याने त्याची वाचा गेली. छोटा जिव्या आसपासच्या महिलांना झोपड्यांमध्ये भिंतीवर चित्रे काढताना बघायचा. त्यातच रंगून जायचा. हळूहळू त्यांना मदत करता करता तोही स्वतः आवडीने चित्रे रंगवू लागला. सर्वांचे प्रोत्साहन त्याला मिळायला लागले. त्याचे कौशल्य बघून सगळे कौतुक करायला लागले. कल्पकता, कल्पनाशक्ती वापरून तो चित्रात प्राणी, पक्षी, झाडे, परिसर यांचा समावेश करायचा. पाड्यावर कुणाकडे लग्नकार्य असले की चौक काढण्यासाठी जिव्याला आवर्जून आमंत्रण दिले जाई. लग्नचौक लिहिण्यात तो पारंगत झाला. मात्र तारुण्यात पदार्पण केल्यावरही तो लग्नघरात चित्रे काढतोय हे समाजाला रुचले नाही. त्याला अक्षरशः वाळीत टाकण्यात आले. पण तरीही त्याने माझा हात सोडला नाही. न डगमगता तो मनापासून चित्रे रंगवत राहिला. त्याची हरवलेली वाचा त्याला परत मिळाली. पुढे भास्कर कुलकर्णी यांची भेट झाल्यावर सावकाराच्या शेतात मजुरी करणाऱ्या जिव्याचे आयुष्यच पालटले. कुलकर्णी, जिव्या आणि चार वारली महिलांना दिल्लीला घेऊन गेले. अपना उत्सवात मी प्रथमच प्रकाशात आले. जिव्याचे सर्वत्र नाव झाले.त्याच्या चित्रांचे मुंबईत केमोल्ड आर्ट गॅलरीत पहिलेच प्रदर्शन झाले. कलारसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. जिव्याबरोबर मी सातासमुद्रापार गेले. आता असा एकही पृष्ठभाग नाही, की ज्यावर मी आकार घेत नाही. खंत इतकीच वाटते की, जेथे माझा जन्म झाला त्या पाड्यांवर आता माझे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. घरं आधुनिक रूप घेतायत त्यामुळे माझा उत्फुर्तपणे आविष्कार होत नाही. परंतु आपण सदैव सजीव-समूर्त राहून सर्वांना आनंद द्यावा हीच माझी आंतरिक आस आहे.
—
जिव्याने घडवली क्रांती !
जिव्या सोमा मशे याने केलेल्या क्रांतीमुळे वारली चित्रकलेचे समृद्ध दालन पुरुषांनाही खुले झाले. जिव्याच्या चित्रांना मागणी वाढत गेली. त्याचा आपल्या देशाबरोबरच इतर अनेक देशांशीही संपर्क आला. नवे जग बघितल्यावर त्याच्या चित्रांमध्ये गाड्या, बस, रेल्वे, विमाने, ऊंच इमारती अशा आधुनिक युगातील प्रतिमा दिसू लागल्या. माझ्या कक्षा रुंदावल्या. मी जगभरात झेप घेतली आणि सर्वपरिचित झाले.१९७६ साली जिव्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला. नंतर त्याला अनेक सन्मान, पारितोषिके मिळाली. या क्षेत्रातील अखंड योगदानाबद्दल २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. पुढे १९७६ साली सरकारने जाहीर केलेली जमीन ३४ वर्षानंतर गंजाड गावाजवळ त्याला मिळाली. मशे परिवाराने तेथे माझे संग्रहालय उभे केले. दोन वर्षांपूर्वी २०१८ साली जिव्याचे वृद्धापकाळाने निधन झाले. आता त्याच्या पश्चात माझा सांभाळ त्याची पत्नी पवनीबाई, मुले सदाशिव, बाळू, नातू विजय, किशोर, प्रवीण करतात. जिव्या हे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. त्याने अनेकांना वारली कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन पारंगत केले आहे. अशा अनेकांच्या प्रयत्नांमुळे मी लोकाभिमुख झाले. ११०० वर्षांची दीर्घ आणि समृद्ध परंपरा असल्याने माझे वर्तमान व भविष्यकाळ उज्ज्वल आहे याविषयी मला खात्री आहे. अनेक तरुण वारली चित्रकार माझे वैभव वाढवत आहेत. मात्र दुःख एवढ्याच गोष्टीचे होते की अनेक तरुण वारल्यांंना जगण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊन गेली तरी परिस्थिती बदललेली नाही.