वॉशिंग्टन – संपूर्ण जागाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकन अध्यक्षांच्या शपधविधी सोहळ्यापूर्वी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अनेकांच्या नजरा खिळल्या. अखेर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले आणि त्याचवेळी वॉशिंग्टन विमानतळावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर म्हणजेच समारोपाची सलामी देण्यात आली.
ट्रम्प यांनी समारोपाचे भाषण करुन मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन चा पुनरुच्चार केला आहे. पुन्हा सत्ता स्थापनेसाठी आम्ही कठोर संघर्ष करु आणि पुन्हा येऊ असे ते म्हणाले. त्यातच अमेरिकन मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प हे नवा पक्ष काढणार असल्याची चर्चा रंगली आहे.
संपूर्ण कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अनेक बाबी तडीस नेल्या. अमेरिकेला उत्तम स्थितीत नेतानाच सैन्याचे धाडस वाढविले. ऐतिहासिक कर भरणाही याच काळात झाल्याचे ट्रम्प म्हणाले. काहीही करुन आम्ही पुन्हा येऊ. आपल्या सर्वांसाठी मी संघर्ष करीत राहिन, असा शब्दही ट्रम्प यांनी दिला.
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले तेव्हा त्यांची पत्नी मेलानिया या सुद्धा त्यांच्या सोबत होत्या. फ्लोरिडातील पाम बीच जवळील निवासस्थानी ट्रम्प आता राहणार आहेत.