नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा धावता नाशिक दौरा आटोपला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे येत्या १५ दिवसात पुन्हा नाशिकला येणार आहेत. राज यांनी एक दिवसीय दौऱ्यात पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
पुढील वर्षीच्या प्रारंभीच नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा नाशिककडे लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वीही नाशिककरांनी मनसेवर विश्वास दाखवून त्यांना सत्ता दिली होती. मात्र, त्यानंतर मनसेचा दारुण पराभव झाला. सध्या भाजपची महापालिकेत सत्ता आहे. आगामी निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी राज यांनी नाशिक दौरा केला. त्यात त्यांनी नाशिकचे प्रश्न, सद्यस्थिती, सत्ताधारी भाजपचा कारभार आदींबाबत माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दौऱ्याबाबत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास नकार दिली आहे. राज हे आज सकाळीच मुंबईला परतले आहेत. येत्या १५ दिवसांनी ते पुन्हा नाशिकला येणार आहेत. त्यावेळी त्यांचा दौराय २ ते ३ दिवसांचा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज यांच्या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.