नवी दिल्ली – कोरोनाने केलेला कहर पाहता कोरोना लसीची सगळेजण आतुरतेने वाट पहात आहेत. पण ती येईतो आपल्याकडे त्यावरून गोंधळ सुरू झाला आहे. यात आता बाबा रामदेव यांच्या विधानाने अधिक भर पडली आहे. संपूर्ण जग कोरोनाची लस घेण्यास उत्सुक असताना आपण ही लस अजिबात घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, यामागे लसीची भीती हे कारण नसून आपला आयुर्वेद, योगा तसेच ध्यानावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
योग्य काळजी न घेतल्याने लोकांनी आपल्या शरीराची वाट लावून घेतली आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आहे. ती वाढवण्याची गरज आहे. यासाठी योगा करण्याची आवश्यकता आहे. कारण, लस जरी मिळाली तरी तिचा प्रभाव फार काळ टिकणारा नाही. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज देशात कोरोनाने बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे, याचे कारण योगा आणि गिलोय हे देखील आहे.
पतंजलीबद्दल लोक काय म्हणतात, याने आपल्याला काही फरक पडत नसल्याचे ते म्हणाले. उलट यानिमित्ताने लोक याबद्दल चर्चा करतात, ही आनंदाची गोष्ट आहे. या उत्पादनांचा लोकांना फायदा होत असेल तर आम्ही लोकांच्या सेवेसाठी कायम तत्पर आहोत असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना लसीबाबत शंका घेणाऱ्यांमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेता जयराम रमेश आणि शशी थरूर यांचाही समावेश आहे