जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील ः पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन
महापालिकेच्या माध्यमातून भारतीय जैन संघटना व सामाजिक संस्थांच्या ‘मिशन नाशिक झिरो’ चे झाले उद्घाटन
नाशिक : जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
नाशिक शहरातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना, शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन नाशिक झिरो’ या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज कालिदास सभागृह येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर सतिश कुलकर्णी, खासदार डॉ.भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा,नंदू साखला, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, प्रशांत पाटील, किशोर सूर्यवंशी, गिरीश पालवे, सतीश सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये कोरोनाला अटकाव ‘मिशन झिरो’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी काढले.
लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, हे काम जबाबदारी आणि कष्टाने करावे लागणार आहे. कोरोना कोणाची जात बघत नाही आपण मनुष्य आहोत याचा विचार करून जे मापदंड हा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित करून देण्यात आले आहेत त्यांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात कोरोना हाच आपल्या सर्वांचा प्रतिपक्ष असून आपल्या सर्वांना कोरोनविरुद्ध एकत्र येऊन लढाई जिंकायची आहे. कोरोनाला घाबरून त्याचा सामना जग करू शकत नाही. ही लढाई एकप्रकारची माणूसकीविरूद्धची लढाई समजूनच प्रत्येकाने त्याचा सामना करावयाचा आहे. सामाज माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहचवून मदत करण्याची गरज असून केवळ शासन आणि महापालिका यात यशस्वी होवू शकत नाही, त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन लोकसहभागातून आपण यावर मात करू शकतो. मुंबई पुण्यानंतर नाशिक आता कोरोनच नेक्स्ट डेस्टिनेशन होत असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आता दृढनिश्चयाने प्रयत्न करावे लागतील. लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून तज्ज्ञांच्या मदतीने आपल्याला यावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी अहोरात्र काम करत आहेत यांच्या श्रमाला आपला सलाम असून हेच सर्व आपल्यासाठी आता देव आहे असे त्यांनी सावेळी सांगितले.
सामुहिक प्रयत्न गरजेचे
महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाच्या जागतिक महामारीच्या या काळात नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. शहराला दिलासा देण्याच काम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यामाध्यमातून नाशिक महानगरपालिका क्षेत्रात काम करण्यात येत आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
रुग्ण संख्या वाढणार पण
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, राज्याच्या तुलनेत नाशिकमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण शोधता आले आहेत. त्यातून रुग्ण जरी वाढत असले तरी त्यासाठी भरीव उपाययोजनाही करण्यात येत आहेत. सामाजिक सहभागातून कोरोनावर मात करण्यासाठी विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून ‘मिशन नाशिक झिरो’ राबविण्यात येत आहे. त्यावर पूर्णपणे नियंत्रण भारतीय जैन संघटना करणार असून फिरते दवाखाने कंटेंटमेंट झोन मध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येऊन अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल त्यातून रुग्ण संख्या अधिक वाढणार आहे. मात्र त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटना होत असून नागरिकांनी आरोग्य सेवकांना चांगली वागणूक द्यावी तसेच यासाठी पोलीस यंत्रणेने यावर लक्ष द्यावे असे त्यांनी आवाहनही महापालिका आयुक्त श्री.गमे यांनी याप्रसंगी केले.
१६ लाख रुग्णांची तपासणी
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले की, जैन संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ४९ ठिकाणी फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबविण्यात येत असून अद्याप पर्यंत १६ लाख रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. लॉकडाऊन संपल्यांनातर कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने ‘मिशन झिरो’ ही संकल्पना तयार करून काम करण्यात येत आहे. कोरोनाची कुठलीही भीती बाळगू नये यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे. आता कोरोनसह आपल्याला जगायचं यासाठी तशी मानसिकता तयार करून उपाययोजना करायला हव्या यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढे यायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.