नवी दिल्ली – परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीवर लष्कराच्या कॅन्टीनमध्ये केंद्र सरकारने बंदी घातली आहे. सरकारचा हा आदेश देशातील चार हजाराहून अधिक लष्करी कॅन्टीनसाठी लागू असेल. आतापर्यंत लष्कराच्या कॅन्टीनमधून आयात केलेली दारू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व इतर वस्तू विकल्या जात होत्या. सैन्य अधिकारी, जवान आणि माजी सैनिकांना सवलतीच्या दरात या वस्तू उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाप्रमाणे परदेशी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरला सैन्याच्या कॅन्टीनमधून परदेशी वस्तूंची विक्री करण्यास बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. मे आणि जुलै दरम्यान लष्कराची, नौदल आणि हवाई दलाशी या विषयावर चर्चा झाली असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी वस्तूंना प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून सैन्याच्या कॅन्टीनमधून परदेशी वस्तूंची विक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिपत्रकात कोणत्याही विशिष्ट उत्पादनाचा उल्लेख नसला तरी, परदेशी दारूच्या विक्रीवर बंदी घातली जाणार असे सांगण्यात आले आहे. इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अॅण्ड अॅनालिसिसच्या म्हणण्यानुसार, सैन्याच्या कॅन्टीनमधून विकल्या जाणाऱ्या एकूण वस्तूंपैकी सरासरी सहा ते सात टक्के वस्तू आयात असतात. देशी उत्पादनांना चालना देण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.