नाशिक – नातेवाईकाकडून घेतलेले हातउसणवार पैसे परत करण्यासाठी मित्राच्या खात्यात पाठविलेल्या २० लाख रूपयांचा एकाने अपहार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे.
मोसीन खान पठाण (रा.सिब्बल फर्निचर शेजारी तिडके कॉलनी) असे मित्रास गंडविणाऱ्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कौशिक अशोक दासवानी (रा.सुरत,गुजरात) यांनी तक्रार दाखल केली आहे. दासवानी यांनी नाशिक स्थित नातेवाईकाकडून २० लाख रूपये हात उसनवार घेतले होते. ते परत करण्यासाठी दासवानी यांनी गेल्या शुक्रवारी (दि.४) संशयीत मित्राच्या येस बँक आणि फेडरल बँक खात्यात प्रत्येकी दहा लाख रूपये असे आरटीजीएस द्वारे ट्रान्सफर केले. मात्र संशयीताने ही रक्कम नातेवाईकाकडे सुपूर्द न करता अपहार केला. पंधरा दिवस उलटूनही नातेवाईकास पैसे न मिळाल्याने त्यांनी दासवाणी यांच्याशी संपर्क साधला असता ही घटना उघडकीस आली. दासवाणी यांनी पैश्याचा तगादा लावला असता संशयीताने टाळटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.
—
इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
नाशिक – कारखान्याच्या इमारतीवर सौर उर्जाचे पॅनल बसवित असतांना पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सलमान जाकिर पिंजारी (१९ रा.स्वारबाबानगर,जगतापवाडी) असे इमारतीवरून पडल्याने मृत्यु झालेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना ग्राफाईड इंडिया लिमीटेड या कारखान्याच्या आवारात घडली. पिंजारी गुरूवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास कार्बननाका परिसरातील ग्राफाईड इंडिया लिमीटेड या कारखान्याच्या इमारतीवर सौर उर्जाचे पॅनल फिट करीत असतांना अचानक सिमेंट पत्रा फुटल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने वडिल जाकिर हुसेन यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार राठोड करीत आहेत.
—